सातारा - वारंवार कानावर आणि मेंदूवर आदळणाऱ्या माहितीमुळे अनेकांना कोरोनाफोबिया होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काहीही नसताना शरीरात कोरोनाच्या विषाणूचा शिरकाव झाल्याचंही अनेकांना वाटू लागलंय. यावर मार्ग काढण्यासाठी साताऱ्यातील परिवर्तन संस्था, महाराष्ट्र अंनिस आणि काही समविचारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन 'मनोबल हेल्पलाईन' नावाचा उपक्रम सुरु केला आहे. याद्वारे तज्ज्ञांच्या माध्यमातून निरोगी व्यक्तीच्या मनातील भ्रम दूर केला जाणार आहे. मानसोपचार तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी याबाबतची माहिती दिली.
संचारबंदीच्या काळात सलगपणे कोरोनाविषयी माहिती, बातम्या, गप्पा यामुळे समाजमनावर या संसर्गजन्य आजाराचे सावट आहे. जगभरातून येणाऱ्या बातम्या आपल्यावर आदळत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडेही विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. याचे आपल्यावर शारीरिक परिणाम तर होत आहेत. पण, मानसिक तणावातूनही आपण जात आहोत. समाजातील काहीजण कुटुंबापासून लांब आहेत. अशावेळी कोणाशी प्रत्यक्ष भेटता न येणं हेसुद्धा ताणाचे असू शकते.
कोरोनाबद्दल खूप उलटी-सुलटी माहिती समाज माध्यमामधून पसरत आहे. त्यामुळे आपल्याला नेमका कशाने संसर्ग होऊ शकतो आणि काय केल्याने त्यापासून सुरक्षित राहू, असे विचारही त्रास देऊ शकतात. अशा लोकांना भावनिक प्रथमोपचार मिळावे, यासाठी परिवर्तन संस्था, महाराष्ट्र अंनिस आणि काही समविचारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन साताऱ्यात 'मनोबल हेल्पलाईन' नावाचा उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये 20 पेक्षा अधिक तज्ज्ञ समुपदेशक आणि प्रशिक्षित मानसमित्र आणि मैत्रिणी यांच्या माध्यमातून हे मदत केंद्र काम करेल. ज्यांना मन मोकळं करण्याची, आधाराची गरज वाटली तर सोबतच्या नंबरवर फोन करावा, असे आवाहन डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले आहे.
- भावनिक आधार देण्याचंही प्रशिक्षण -
आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना भावनिक आधार कसा द्यावा? या विषयीचे 'चला भावनिक प्रथमोपचार द्यायला शिकूया, हे ऑनलाईन प्रशिक्षण देखील परिवर्तन संस्थेमार्फत आयोजित केले जात आहे. हे प्रशिक्षण घेतलेले लोक स्वतःच्या आणि मित्र मंडळी आणि नातेवाईक यांची कोरोनासंबंधित चिंता भीती अधिक प्रभावीपणे हाताळू शकतात.
- मराठी-हिंदीत समुपदेशन -
महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्याबाहेरील लोकांना केवळ एका फोनवरून मोफत समुपदेशनाची सुविधा मिळणार आहे. ही सेवा मोफत असून, यासाठी कोणतेही शुल्क नाही. मराठी आणि हिंदी भाषेतून ही सेवा पुरवली जाणार असून, इच्छुकांनी रेश्मा कचरे 9561919320 किंवा योगिरी मगर 9665850769 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.