सातारा - तरुणाला महाबळेश्वरला फिरायला नेत बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी धमकी दिल्याची घटना घडली. तरुणाला गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी देखील मागितल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी एका तरुणीसह फलटणच्या तिघांवर पाचगणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पाचगणीतील हाॅटेलमध्ये होते मुक्कामी -
फलटणमध्ये रहात असलेल्या पुण्यातील एका तरुणीने एका तरुणाला महाबळेश्वरला फिरायला नेले. जाताना ते पाचगणीतील एका हॉटेलमध्ये थांबले. तेथून दोघे बाहेर येत असताना मारुती दिलीप शेलार, अमोल भिमा यमपुरे व सुरज शिवाजी देवकर (सर्व रा. फलटण) यांनी दमदाटी करत तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. 'तुला बलात्काराच्या गुह्यात अडकवतो' असे धमकावत एक लाख रुपयांची खंडणी मागितली. सोबत असलेल्या तरुणीनेही 'तू त्यांना पैसे दे नाहीतर तुला मी खोट्या बलात्काराच्या गुह्यात अडकवेल', अशी धमकी दिली.
पाचगणी पोलिसांत गुन्हा -
या प्रकरणी पीडित तरुणाने तरुणीसह मारुती शेलार, अमोल यमपुरे, सुरज देवकर यांच्याविरुद्ध पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक फौजदार कदम करत आहेत.