सातारा Satara Crime News : साताऱ्यातील कैकाड गल्लीत महिलांच्या सार्वजनिक शौचालयात अज्ञातांनी अघोरी प्रकार करत महिलांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. विद्रुप चेहऱ्याची महिला पाहून सार्वजनिक शौचालयातून महिलांच्या किंकाळ्या ऐकू आल्याने साताऱ्यातील आख्खी कैकाड गल्ली जागी झाली. बॅटरीच्या उजेडात नीट पाहिल्यानंतर कपड्याच्या दुकानातील पुतळ्याला साडी गुंडाळून तो पुतळा शौचालयात ठेऊन खोडसाळपणा केल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
काळोखात दिसली विद्रुप महिला : साताऱ्यातील रविवार पेठेमध्ये सोमवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातच शौचालयात गेलेल्या महिलांना एका विचित्र आकृती दिसल्याने त्यांनी किंकाळ्या फोडल्या. त्यामुळं संपूर्ण गल्ली जागी झाली. काही लोकांनी बॅटरीच्या उजेडात नीट पाहिलं असता विद्रुप चेहऱ्याची कोणी महिला नसून तो पुतळा असल्याचं स्पष्ट झालं. मात्र, हा पुतळा पाहून महिलांची बोबडी वळली होती. हा अघोरी खोडसाळपणा एखाद्या महिलेच्या जीवावर देखील बेतू शकला असता.
महिलांना भीती दाखवण्याचा अघोरी प्रकार : कपड्यांच्या दुकानांच्या बाहेर वस्त्रप्रावरणांची जाहिरात करणारे पुतळे आपण शहरात पाहत असतो. अशाच एका पुतळ्याला महिलेसारखा मेकअप करून साडी गुंडाळली होती. त्यानंतर अज्ञातांनी तो पुतळा महिलांच्या शौचालयात ठेवला होता. रात्री अकराच्या सुमारास शौचास गेलेल्या कैकाड गल्लीतल्या दोन बायकांनी तो पुतळा बघून किंकाळी फोडली. महिलांना भीती दाखवण्यासाठी केलेल्या या अघोरी प्रकाराबद्दल साताऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
महिला तापाने फणफणल्या : चेष्टा आणि प्रँक करण्याच्या या प्रकारामुळं घाबरून गेलेल्या महिला तापाने फणफणल्या. अघोरी खोडसाळपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. पोलिसांनी यासंदर्भात गोपनीयरित्या माहिती मिळवली. या प्रकरणी अल्पवयीन मुलगा, महिला आणि दोन तरूणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेष्टा अथवा खोडसाळपणा करताना इतरांना होणाऱ्या त्रासाची जाणीव असायला हवी. तसेच लोकांनी सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार करण्याचं टाळलं पाहिजं. असं अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितलं
हेही वाचा -