कराड (सातारा) - महात्मा गांधींनी ब्रिटीशांविरोधात 'भारत छोडो'ची गर्जना केल्यानंतर संपुर्ण देशात क्रांतीची ज्योत पेटली. याच पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट १९४२ रोजी उंडाळे (ता. कराड) येथील बाळकृष्ण पाटील तथा दादा उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली कराड मामलेदार कचेरीवर हजारो लोकांनी शिस्तीबद्ध मोर्चा काढला होता. दादा उंडाळकर यांना ब्रिटीशांनी अटक केली होती. आज या घटनेला ७८ वर्षे पुर्ण होत आहेत.
मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांती मैदान) ८ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला 'चले जाव'चा इशारा दिला. 'लढेंगे या मरेंगे'ची घोषणा झाली आणि बघता बघता सारा देश पेटून उठला. देशभर आंदोलने, मिरवणुका, मोर्चे निघू लागले. ब्रिटीश सरकारने जमावबंदी लागू केली. लोक पोलिसांच्या लाठी हल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले. जनतेने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारल्याची परिस्थिती होती. अशा परिस्थितीत उंडाळे (ता. कराड) येथील बाळकृष्ण पाटील तथा दादा उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली कराड मामलेदार कचेरीवर हजारो लोकांनी शिस्तीबद्ध मोर्चा काढला होता.
कराडच्या मामलेदार कचेरीबाहेर सभा सुरू असताना सभेत एक पोलीस अधिकारी आला. त्याने मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या दादा उंडाळकर यांना अटक केल्याचे सांगितले. त्यानंतर सशस्त्र पोलिसांनी जमावावर हल्ला केला. तथापि, मोर्चाचे नेतृत्व करणारे दादा उंडाळकर उभे राहिले व त्यांनी सर्व लोकांना शांत केले. जमावाला उद्देशून ते म्हणाले, आपला मोर्चा यशस्वी झाला आहे. विजय आपलाच आहे. आता आपण शातंपणे परत फिरा. जे आपणास अटक करू इच्छितात. त्यांना अटक करू देण्याइतपत आपण या घटकेला सामर्थ्यवान आहोत. मला झालेली अटक मी स्विकारली आहे. "करा किंवा मरा' हा गांधीजींचा संदेश आहे. पण त्याबरोबर त्यांनी अहिंसेेचे पालन करण्याबद्दलही बजावले आहे.
दादा उंडाळकरांनी जमावाला शांत केल्यामुळे कराडचा मोर्चा शांततेत आणि अहिंसक पद्धतीने यशस्वी झाला. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र लढ्यात या मोर्चाची नोंद झाली. या घटनेला आज ७८ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त कराड तहसील कार्यालयाच्या आवारातील क्रांती स्तंभाला स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकरांचे सुपूत्र तथा माजी मंत्री विलासकाका उंडाळकर, नातू आणि जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, डीवाय एसपी सुरज गुरव, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, किशोर धुमाळ यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले आहे.