सातारा - जिल्ह्यातील 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येबरोबरच मृतांचा आकडा वाढत आहे. ताज्या अहवालासह जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या 80 झाली आहे. दरम्यान, 69 जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात शेळकेवाडी (ता.सातारा) येथील 75 वर्षीय व्यक्ती, नेर (ता.खटाव) येथील 74 वर्षीय , साताऱ्यातील 45 वर्षीय व्यक्ती यांचा कोरोना संशयित म्हणून उपचारादरम्यान नमुना घेण्यात आला होता. तो कोरोनाबाधित असल्याचे अहवाल आला. तसेच नेरले (ता. पाटण) येथील 50 वर्षीय व्यक्ती अशा चौघांचा आणि कराड तालुक्यातील सैदापूर व कालवडे येथील दोन महिला, असे एकुण सहा बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी (दि. 17 जुलै) रात्री उशिरा जिल्ह्यातील एकूण 69 नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जावळी तालुक्यातील पुनवडी गाव हाॅटस्पाॅट ठरले आहे. तेथील 2 वर्षांच्या बालकासह 22 लोक बाधित आढळले. शिवाय वाई तालुक्यातील 19, सातारा 3, कराड 3, खंडाळा 6, कोरेगांव 6, खटाव 1, महाबळेश्वर 3 व पाटण तालुक्यातील दोघे बाधित आढळले.
सातारा जिल्ह्यातील एकूण 2 हजार 213 बाधित झाले असून पैकी 1 हजार 225 कोरोनामुक्त झाले आहेत. 80 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यातील 908 सक्रीय (अॅक्टीव्ह) रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग राज्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी (दि. 17 जुलै) सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारापेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात 8 हजार 308 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 2 हजार 217 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.81 टक्के असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 60 हजार 357 इतकी झाली आहे.