सातारा - गेल्या 10 दिवसांपासून कोयना परिसरात सुरू असलेल्या धुवांधार पर्जन्यवृष्ठीमुळे महाराष्ट्राची भाग्यलक्षमी कोयना जलाशयात तब्बल 64 हजार 400 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर 105.25 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना जलाशयात शुक्रवारी 89 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. वाढत्या पावसाचे प्रमाण आणि शिवाजीसागर जलाशयातून येणाऱ्या पाण्याची आवक पाहता कोयना धरणात निर्धारित जलपातळी राखण्यासाठी शुक्रवारी कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फुटाने उचलण्यात आले आहेत.
कोयना नदी पात्रात तब्बल 11 हजार क्युसेक आणि पायथा विजगृहातून 2 हजार 100 असे एकूण 13 हजार 527 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
दरम्यान, पावसाचे प्रमाण वाढले तर कोयना धरणाच्या गेटमधून आणखी पाण्याचा विसर्ग वाढवणार असल्याची माहिती कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी सकाळी 7 पर्यंत महाबळेश्वरमध्ये 213 मिलिमीटर तर नवजा 155 मिलिमीटर उच्चांकी पावसाची नोंद करण्यात आली.