सातारा- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच एका कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने 54 जणांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून सर्वजन निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
हेही वाचा- मुंबईतील पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल पण...
बुधवारी अनुमानित म्हणून कृष्णा हाॅस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 35 वर्षीय तरुण कोरोना बाधित असल्याचा अहवाल मिळाला. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने संबंधित गावाच्या सीमा पुर्ण बंद केल्या. त्या तरुणाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेत 55 जणांना कृष्णा हाॅस्पिटलमध्ये अनुमानित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले. त्यांचा आज वैद्यकीय अहवा प्राप्त झाला असून कोणालाही बाधा नसल्याचे स्पष्ट झाले. अद्याप एका अनुमानिताचा अहवाल प्रतिक्षेत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील 21 मार्च रोजी अबुधाबी येथून प्रवास करुन आलेल्या 27 वर्षीय युवकाला सर्दी असल्याने शासकीय रुग्णालयात व 31 वर्षीय पुरुषाला श्वसन संस्थेचा तीव्र जंतुसंसर्ग असल्यामुळे 3 एप्रिल रुग्णालयात दाखल केले. या दोघांच्या घशातील स्त्रावाचा नमुना एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.