सातारा - सातारा बसस्थानकावर लागलेल्या आगीत ५ शिवशाही बसेस जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत खासगी मालकांचे सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एका विक्षिप्त मुलाने ही आग लावल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
१ कोटीचे नुकसान-
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सातारा मध्यवर्ती बसस्थानकावर खासगी तत्त्वावरील शिवशाही बसने पेट घेतला. त्याच्या लगतच्या बसमध्येही आग पसरली. महामंडळाचे कर्मचारी व नागरिकांनी बसमधील अग्निशमन यंत्रणेचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका उडाला. या आगीमध्ये बस शेजारी उभ्या असलेल्या इतर पाच शिवशाही बसने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत बसच्या पाचही बसेसच्या बॉडीज जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
संशयित मुलगा ताब्यात-
सातारा बसस्थानकाच्या आगार प्रमुख रेश्मा गाडेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एक विक्षिप्त मुलगा बाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसून सिगारेट ओढत असल्याचे तसेच त्याने बसचे पडदे पेटवल्याचे महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व त्या मुलाला बाहेर काढुन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
हेही वाचा- छेड काढणाऱ्या तरुणांना तरुणीने शिकवला धडा; औरंगाबादमधील घटना