सातारा - संचारबंदीत मद्यविक्री बंद असल्याने, तळीरामांनी गळा कासाविस होत आहे. दारू मिळत नसल्याने काहीजण वेगवेगळ्या क्लृप्त्या योजत आहेत. दारूसाठी कासावीस झालेल्या ५ तळीरामांनी चक्क सॅनिटायझर पिल्याने यातील तिघांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील जिंती येथे आली आहे. किरण सावंत, दीपक जाधव आणि अशोक रणनवरे असे आपला जीव गमवावा लागलेल्या तरुणांची नावे आहेत.
घटनेची पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, मृत किरण, दीपक आणि अशोक हे तिघेही तरुण मोलमजुरी करत होते. पुरंदर तालुक्यातील राख येथील डाळींबाच्या बागेत दोघेही मजुरी करत होते. तेथूनच काम करुन ते 25 एप्रिलला गावी आले होते. गावी आल्यानंतर त्यांची साखरवाडी येथील आरोग्य केंद्राच्या पथकाने तपासणी केली होती. त्यानंतर त्यांना होमक्वारंटाईन करून तसे शिक्के त्यांच्या हातावर मारण्यात आले होते.
त्या तिघांनीही सॅनिटायझर पिल्याची चर्चा आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी तेथीलच एका व्यक्तीचा सॅनिटायझर पिल्यानेच मृत्यू झाल्याचे समजत आहे. तेथील एकूण पाच जणांनी हे कृत्य केले असून त्यामध्ये दोघांचा रात्री तर एकाचा सकाळी मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिंती येथील तरुणांनी नशेसाठी सॅनिटायझर प्राशन केल्याने या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छदेन अहवालानंतरच कळेल अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी सांगितली. दरम्यान पोलिसांनीही मृत तरूणांनी सॅनिटायझर प्राशन केल्याची शक्यता वर्तवली आहे.