सातारा - जिल्ह्यात कोरोना वेगाने पाय पसरू लागला आहे. मंगळवारी सकाळी आठ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर जिल्ह्यातील आणखी २० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जावळी, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा या तालुक्यात आलेल्या प्रवाशांसह काही बाधितांचे निकट सहवासीत असलेल्या रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. एका दिवसात सातारा जिल्ह्यात 28 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
पाटण तालुक्यातील शिरळ गावात सहा दिवसांपूर्वी अहमदाबादवरून आलेल्या कुटुंबातील ७० वर्षाच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहमदाबादवरून आपल्या कुटुंबातील 4 लोकांबरोबर हा वयोवृद्ध रुग्ण आपल्या घरी आला आहे. कोयना विभागात घर वापसी करणाऱ्यांची संख्या 7,460 आहे. या घटनेमुळे पाटण तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे.
दरम्यान, कराड तालुक्यातील म्हासोलीत 4 आणि शामगावमध्ये 1 रुग्ण वाढला आहे. खालकरवाडीत 1, पाटण तालुक्यात 2, कोरेगाव तालुका 2 , वाई 1, सातारा 5, खंडाळा 1, जावली 1, खटाव 2 याप्रमाणे 20 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 166 झाली आहे.