सातारा - कराडनजीकच्या मलकापूर उपनगरातील दांगट झोपडपट्टीत दि. 6 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास विकी लाखे यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. घटनेनंतर पसार झालेल्या संशयीतांपैकी दोघांना कराड शहर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना न्यायालयाने 6 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तब्बल 40 दिवसांनी दोन संशयीत पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान, बुधवारीच सातार्यात क्राईम मिटींग होती. त्यामध्ये जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा झाल्याचे समजते.
विकी लाखे खून प्रकरणी अर्जुन पोळ आणि त्याच्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात अजुन काही जणांचा सहभाग आहे. हत्येचा कट कोणी रचला, गोळीबार कोणी केला, गुन्ह्यात वापरलेली पिस्तुले कोठून आणली, कट कोठे रचला, यासारख्या प्रश्नांची उकल पोलीस करत आहेत. तसेच या कटात कोण-कोण सहभागी आहे, हत्येमागील नक्की कारण काय, याची माहिती संशयितांकडून मिळाल्यानंतरच विकी लाखेच्या खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे.
गणेशोत्सवापूर्वी कराडातील गुंड पवन सोळवंडे आणि त्यानंतर मलकापूरात विकी लाखेवर बेछूट गोळीबार करत त्यांचा खून करण्यात आल्यामुळे दोन्ही ठिकाणी तणावाचे वातावरण होते. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले. गुंडांच्या टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई केली जात असली, तरी कराड, मलकापूरच्या गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यात कराडचे पोलीस सातत्याने अपयशी ठरत आहेत. बर्याच दिवसांनी कराडला खमक्या डीवायएसपी मिळाला आहे. परंतु, अन्य अधिकार्यांची कामगिरी सुमारच आहे. क्राईम मिटींगमध्ये कराडमधील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात गंभीर चर्चा झाल्याचे समजते.