सातारा - गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेऊन 19 लाखांचा गुटखा कराड ग्रामीण पोलिसांनी जप्त केला होता. तो गुटख्या अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार वन विभागाच्या हद्दीत कराड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी दुपारी जाळून नष्ट केला.
बंगलोरहून पुण्याकडे जाणार्या टेम्पोमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती कराड ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कराड ग्रामीण पोलिसांनी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सापळा लावला होता. संशयित टेम्पो अडवून त्याची तपासणी केली असता टेम्पोमध्ये 63 गोण्यांमध्ये भरलेला 19 लाखांचा जर्दा आणि पान मसाला सापडला होता. 15 जून 2019 रोजी ही कारवाई करण्यात आली होती.
जप्त मुद्देमाल कराड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात होता. हा जप्त केलेला गुटख्या अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी कराड तालुक्यातील अंतवडी गावातील वन विभागाच्या हद्दीत जाळून नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी रोहन शहा यांच्या समक्ष आणि वन अधिकार्यांच्या मदतीने कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा नष्ट करण्यात आला. यावेळी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यातील हवालदार डी. डी. जाधव, मसूरचे वनपाल, गृहरक्षक दलाचे कर्मचारी उपस्थित होते.