कराड (सातारा) - कराडमधील आणखी १५ रुग्ण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले. यामुळे तालुक्याची कोरोनमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या १५ रुग्णांना शुक्रवारी फुलांचा वर्षाव करत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासुन तालुक्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.
सह्याद्री हॉस्पिटलमधील 12 आणि कृष्णा हॉस्पिटलमधील 3, असे एकूण 15 जण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले. रुग्णालयातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी टाळ्यांच्या गजरात, फुलांचा वर्षाव करत त्यांना निरोप दिला. कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये कराड रुक्मिणीनगर येथील 28 वर्षीय महिला, मलकापूर येथील 55 वर्षीय महिला आणि वनवासमाची येथील 74 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या सगळ्यांवर हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफ आणि सुरक्षा रक्षकांकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील आणि नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.
रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. कोरोनामुक्त होऊन जाताना त्यांनी कृष्णा हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या कष्टाचे कौतुक केले. समाजाने आमच्याकडे वेगळ्या नजरेने न पाहता आम्हाला आपल्यात सामावून घ्यावे, असे भावनिक आवाहन त्या महिलेने केले.