सांगली - डॉक्टरांवर कारवाईची मागणी करणाऱ्या विटा येथे एका तरुणाने तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा प्रयत्न वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. प्रशांत कदम असे आत्मदहन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. विटा येथील एका रुग्णालयामध्ये कोरोना उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाले असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी प्रशांत कदम याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
विटा येथे राहणाऱ्या प्रशांत प्रताप कदम या तरुणाच्या वडिलांचे विट्यातील श्री हॉस्पिटल याठिकाणी 2 जून 2021 रोजी कोरोना उपचारादरम्यान निधन झाले आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रशांत कदम याने करत याप्रकरणी डॉक्टर व रुग्णालयावर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र एक महिन्यापासून कोणत्याही प्रकारची चौकशी तहसीलदार यांच्याकडून होत नाही. याबाबत टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत रुग्णालयावर कारवाईच्या मागणीसाठी प्रशांत कदम यांनी थेट विटा तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. कार्यालयाच्या आवारात घुसून प्रशांत कदम याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी प्रशांत कदम याला तत्काळ ताब्यात घेत आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला.