सांगली - शिरच्छेद करुन देवराष्ट्र येथे युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जयसिंग जमदाडे असे मृताचे नाव आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देवराष्ट्र-शिरगाव रस्त्यावर गुरुवारी शीर आणि धड वेगळे असलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मृत जयसिंग जमदाडे हे वैरण आणण्यासाठी सकाळी शेतात गेले होते. गाडीवरुन वैरण घेऊन येत असताना जुन्या शिरगाव - देवराष्ट्र रस्त्यावर संशयित आरोपी लक्ष्मण मुढे याने जमदाडे यांच्यावर हल्ला केला. जमदाडे हे गाडीवर बसले असतानाच आरोपीने त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यानंतर शीर तोडून ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला झाडामध्ये टाकले. यावेळी तेथील परिसरातील शेतात काम करत असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने आरोपीने तिथून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच चिंचणी - वांगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिंचणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून मुढे यांनी हा निर्घृण खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून याबाबत चिंचणी- वांगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस संशयित मुढे याचा शोध घेत आहेत.