सांगली - विनाटेस्ट बनावट कोरोना रिपोर्ट देणाऱ्या तरुणाला सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिरजेच्या सिनर्जी रुग्णालयामधील एका कर्मचाऱ्याकडून हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी स्वप्नील बनसोडेला अटक करण्यात आली आहे.
विना टेस्ट कोरोना रिपोर्ट देण्याचा प्रकार -
कोरोनाची गंभीर परस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार मिरजेतील सिनर्जी रुग्णालयामध्ये समोर आला आहे. रुग्णालयामध्ये आय टी विभागात सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या स्वप्निल बनसोडेकडून विना टेस्ट कोरोना रिपोर्ट देण्यात येत असल्याचा प्रकार सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून उघडकीस आणला आहे. जिल्हा बंदी, राज्य बंदी असल्याने पर जिल्ह्यात आणि राज्यात जाणाऱ्या व्यक्तींसाठी रुग्णांच्यासाठी ई-पाससाठी कोरोना टेस्ट आवश्यक असल्याने अश्या व्यक्तींना विना टेस्ट कोरोना रिपोर्ट देण्याचा उद्योग स्वप्नील बनसोडेकडून सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली, त्यानंतर पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून रिपोर्ट हवा असल्याची मागणी केली असता, बनसोडेने प्रति रिपोर्ट 500 रुपयांचा मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी बनसोडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आता पर्यंत 2 विनाटेस्ट कोरोना रिपोर्ट, ई-पास आवश्यक असणाऱ्या आणि मृत रुग्णांना देण्यात आल्याची कबुली दिली असून या प्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.