सांगली - वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे सुकुमार संभाजी जाधव (वय 21) या नामांकित पैलवानाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (20 मे) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने वाटेगाव परिसरात व कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लटके मळा येथे सुकुमार शेतात गेला होता. शेतात पोल्ट्री आहे. त्या ठिकाणी पोल्ट्री शेडचे काम सुरू होते. तेथे सुकुमार लोखंडी अँगल उभा करत होता. तेव्हा अँगलचा धक्का बाजूनेच गेलेल्या 11 केवी विजेच्या तारेला लागला. त्यामुळे सुकुमारला जोराचा शॉक बसला. तो तिथेच कोसळला. ही घटना घडताच तेथील लोकांनी सुकुमारला ताबडतोब कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याची तपासणी करून डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
महाराष्ट्रकेसरीचे स्वप्न पूर्ण अधुरे
सुकुमारने अल्पावधीतच वाटेगावचे नाव कुस्ती क्षेत्रात उज्वल केले होते. महाराष्ट्र केसरीपर्यंत धडक मारण्याचा त्याचा मनसुबा होता. कै. पैलवान हिंद केसरी गणपतराव आंदळकर आबा यांचा तो शिष्य होता. न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर येथे सुकुमार कुस्तीचे धडे गिरवत होता. महाराष्ट्र केसरीचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने त्याच्यावर घाला घातला. त्याच्या जाण्याने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचाच - गडचिरोलीत पोलीस-नक्षल्यांदरम्यान चकमक, 13 नक्षल्यांना कंठस्नान