सांगली- अंबाबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून पडले आहे आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. त्यामुळे, सुवासिनी महिलांनी पांढऱ्या धाग्यातील हळकुंड गळ्यात बांधावे, अशी अंधश्रद्धा पसरवली जात आहे. ही केवळ अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून करण्यात आले आहे.
सध्या कोरोना विषाणूने देशात आणि राज्यात थैमान घातले आहे. मात्र, हा विषाणू देवीच्या कोपामुळेच झाल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. कोरोनाची महामारी हा देवीचा प्रकोप असल्याचे सांगून लोकांना मुर्ख बनवण्याचा प्रकार ग्रामीण भागत सुरू आहे. अंबाबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून पडल्याने देवीच्या डोळ्यातून पाणी येत आहे अशी अंधश्रद्धा पसरवली जात आहे. त्यामुळे, देवीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याने आपण अडचणीत येणार या भावनेने वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सुवासिनी पांढरा धागा पिवळा करून त्यामध्ये हळकुंड बांधून गळ्यात बांधत आहे. इतकेच नव्हे तर, नागरिकांकडून त्यांच्या नातेवाईकांनाही फोन करून सदर त्याचे अनुकरण करण्यास सांगितले जात आहे.
यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा अध्यक्ष संजय बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये. ही निव्वळ अंधश्रद्धा असून महिलांनी त्यास बळी पडू नये असे सांगितले. दरम्यान, शास्त्रज्ञ कोरोना विषाणूवर औषध तयार करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गळ्यात हळकुंड बांधण्याचा हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धेचा कळस म्हणावा लागेल.
हेही वाचा- सांगलीत संचारबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगची ऐसी की तैशी... भाजीपाला खरेदीसाठी तुंबड गर्दी