सांगली - सरसकट शेतकरी कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या ब्रह्मनाळ या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. विविध कार्यकारी सोसायटीला टाळे ठोकत शेतकऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन केले.
राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ याठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली गावातील विविध कार्यकारी सोसायटीला टाळे ठोकण्यात आले. गावातील महिलांच्या हस्ते यावेळी कार्यालयाला कुलूप लावण्यात आले. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी सोसायटी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी 8 जानेवारीला पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदमध्ये सहभाग घेऊन सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.