सांगली - वैद्यकीय क्षेत्र आज प्रचंड प्रगत झाले आहे. मात्र, असे असले तरी ग्रामीण भाग, शहरातील झोपडपट्टी आणि गोरगरीब रुग्ण आजही योग्य औषधोपचार घेण्याच्या बाबतीत चुकीचे पाऊल टाकतात. तात्काळ आणि सोयीचे ठिकाण व औषध उपचाराबाबत असणारे अज्ञान यामुळे पात्र डॉक्टरांऐवजी पात्रता नसणाऱ्या डॉक्टरांकडे धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - हिंदुस्थान म्हणून जगण्यासाठी शिवसेनाच आवश्यक - संभाजी भिडे
वैद्यकीय क्षेत्र बनले अत्याधुनिक..
सांगली जिल्ह्यातील मिरज हे वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर मानले जाते. पश्चिम महाराष्ट्रात मिरज नगरी हे आरोग्याची पंढरी मानली जाते. आज वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक उपचार पद्धती सुविधा उपलब्ध आहेत. किरकोळ उपचारापासून अती गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या सुलभ पद्धतीने तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत केल्या जातात. असे जरी असले तरी ग्रामीण भाग किंवा शहरातल्या झोपडपट्टी, अथवा गोरगरीब रुग्णांना योग्य उपचाराच्या अभावाचा फटका बसत असल्याच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे.
वेळ आणि आर्थिक अडचण..
ग्रामीण भागात आणि विषेशत: झोपडपट्टी भागामध्ये असणारे अनेक रुग्ण जवळचे ठिकाण म्हणून तातडीचे उपचार घेण्यासाठी पात्रता नसणाऱ्या डॉक्टरांकडून उपचार घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे, अनेक गोरगरीब रुग्णांना प्रसंगी जीव गमावण्याची वेळ सुद्धा येते. तात्पुरता आराम मिळावा म्हणून हे रुग्ण सोयीचे ठिकाण आणि पैशांच्या अडचणीमुळे पात्रता नसणाऱ्या डॉक्टरांकडे जातात.
पात्र डॉक्टरांची संख्या वाढत आहे..
याबाबत सांगलीतील प्रसिद्ध फॅमिली फिजिशियन डॉक्टर विलास कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आज मेडिकल सायन्स टेक्नॉलॉजी खूपच प्रगत झाली आहे. वैद्यकीय पात्र डॉक्टरांची संख्या वाढत आहे. तसेच, प्रत्येक ब्रँडनुसार ती वाढत आहे. सोयी, सुविधा त्यामुळे अचूक निदान व योग्य औषध उपचार रुग्णांना मिळण्यात कसलीही अडचण नाही. मात्र, असे असतानाही ग्रामीण आणि शहरी भागातल्या झोपडपट्टी भागामधील अनेक रुग्ण अपात्र डॉक्टरांकडे जात असल्याच्या घटना घडतात.
अज्ञान आणि गरिबी मुख्य मुद्दा...
या सगळ्याचा विचार केला तर ही सगळी माणसे आजारी पडल्यास पात्र नसलेल्या डॉक्टरांकडे जातात. कारण, पात्र नसलेली व्यक्ती सहज उपलब्ध होतात. अचानक काही घडल्यास अत्यंत जवळचे ठिकाण, तात्पुरत्या उपायामुळे बरे वाटणे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गरिबी. पैसे कमी लागतात आणि आपल्या ठिकाणाला सर्व होते, या प्रमुख गोष्टी आहेत. पण, हे अत्यंत धोकादायक आहे.
केवळ वरकरणी उपचार, निदान नाही..
पात्र नसणाऱ्या डॉक्टरांकडून केवळ लाक्षणिक चिकित्सा होऊ शकते. किरकोळ स्वरुपातील दुखणे थांबते. मात्र, तात्पुरता आराम मिळाला म्हणजे आजार बरे झाले असे नाही, उलट योग्य पद्धतीची चिकित्सा झाली नाही, तर तो आजार आतून वाढू शकतो आणि हे धोकादायक आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या रुग्णाला पोटात दुखत असेल तर पात्र नसलेल्या डॉक्टराकडून इंजेक्शन अँटिबायोटिक औषध देऊन ते दुखणे थांबवले जाते. मात्र, पोटात तो आजार वाढण्याची मोठी शक्यता असते आणि त्यातून आणीबाणीची स्थिती निर्माण होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पात्र डॉक्टरांकडे जाणे योग्य पर्याय..
या उलट, मात्र पात्र डॉक्टरांकडून उपचार घेतल्यास त्याबाबत योग्य निदान होऊ शकते. उदाहरणार्थ क्षयरोग (टीबी) टायफाईड अशा आजारांमध्ये डॉक्टरांकडून नियमित औषधोपचार केले जातात आणि कधी पर्यंत औषधोपचार घ्यायचे हे पात्र डॉक्टरांकडून सांगितले जाते, असे कुलकर्णी यांचे मत आहे.
शासनाच्या अनेक मोफत योजना उपलब्ध..
तसेच, आज ग्रामीण भागात उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तित्वात आहेत. त्याच्या व्यतिरिक्त शहरी भागातसुद्धा शासकीय रुग्णालये, त्याचबरोबर आरोग्य केंद्रे सुरू आहेत. या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे पात्र डॉक्टर्स आहेत. शिवाय गोरगरीब रुग्णांना चांगले औषधोपचार मिळावेत यासाठी शासनाच्या विविध शासकीय योजनासुद्धा मोफत राबवल्या जातात. त्यामुळे, अशा रुग्णांनी याचा लाभ घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविका असतील किंवा हेल्थ वर्कर्स असतील यांची मदत होऊ शकते, असे मतही डॉक्टर विलास कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - जयंत पाटील हे अनुकंपा तत्वावर आलेले राजकारणी, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका