सांगली - महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सरकार झोकून देऊन काम करेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारशी सकारात्मक चर्चा पार पडली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. सांगलीत तरुण मराठा क्लबच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या जयंत रेस्क्यू फोर्सच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
जयंत पाटलांचा कृष्णा नदीत बोटीतून फेरफटका
सांगली जिल्ह्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीशी सामना करण्याच्या दृष्टीने सांगलीवाडी येथील तरुण मराठा ग्रुपच्या वतीने माजी नगरसेवक हरिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली "जयंत रेस्क्यू फोर्स"ची स्थापना करण्यात आली आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास या जयंत रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून बचाव कार्य केले जाणार आहे. रविवारी (20 जून) जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते जयंत रेस्क्यू फोर्सचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी जयंत पाटलांनी कृष्णा नदीच्या पात्रात बोटीतून फेरफटका मारत पाहणी केली आहे.
'आपत्ती आल्यास झोकून देऊन काम करणार'
'महाराष्ट्रामध्ये पूर येतो. त्याचा फटका सांगली-कोल्हापूर-साताऱ्यासह कर्नाटक राज्यालाही बसतो. त्यामुळे या संभाव्य पुराच्या बाबतीत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय असावा यासाठी बेंगलुरु येथे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली. याला कर्नाटक राज्येनेही चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या वर्षी पूर कसा कमी येईल यासाठी दोन्ही राज्य सरकारने प्रयत्न केले. आता महाराष्ट्र सरकारने यामध्ये आणखी सुधारणा करत धरण क्षेत्रात आधुनिक मोठ्या प्रमाणात पर्जन्यमापक यंत्रणा कार्यन्वित केली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात आणि त्याच्या खालील गावांमध्ये, नदीपात्रात किती पाऊस पडेल? पाण्याची पातळी किती वाढेल? याचा अंदाज येणार आहे. त्याचबरोबर पूरपरिस्थिती निर्माण होऊ लागल्यास नदीकाठच्या गावांमध्ये किती फुटांवर पाण्याची पातळी गेल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते, याबाबतचे नकाशे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून प्रत्येक गावात देण्यात आलेले आहेत. पण पूर पूरस्थिती निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. तरीही कोणतेही संकट आल्यास सरकार झोकून देऊन काम करेल', असे जयंत पाटलांनी म्हटले.
हेही वाचा - अहमदनगरमध्ये रेशनचा काळाबाजार; ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त