सांगली - जलसिंचन योजनेसाठी ६०० कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. याला तत्वतः मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ६४ गावांचा पाणी प्रश्न निकाली निघणार असल्याची माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय काका पाटील यांनी दिली. ते आज सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न आजही गंभीर आहे. हा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळतात पडला आहे. थोड्याफार प्रमाणात म्हैसाळ सिंचन योजना या तालुक्यातील काही गावांना वरदान ठरली. मात्र, पूर्व भागातील ४२ गावांसह अनेक गावांमध्ये म्हैसाळ सिंचन योजना पोहोचू शकली नाही. त्यामुळे या गावांचा समावेश मनिषा सिंचन योजनेमध्ये करावा आणि तहानलेल्या गावांना पाणी द्यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.
शेजारच्या कर्नाटक राज्यातून या ४२ गावांना पाणी देण्याबाबतचा अनेक वेळा प्रयत्न झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या बैठकाही झाल्या. पण प्रत्यक्षात त्यावर ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे कर्नाटकातून पाणी मिळण्याचा प्रश्न रेंगाळला आहे. आता ४२ गावासह ६४ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी म्हैसाळ सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातुन नवी योजना तयार करण्यात आल्याची माहिती सांगलीचे खासदार व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय काका पाटील यांनी आज दिली आहे.
या योजनेमुळे ६० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून, दुष्काळी जनतेच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार असल्याचे मतही पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जतचे आमदार विलासराव जगताप व भाजपचे नेते अरविंदभाऊ तांबवेकर,शेखर इनामदार आदी उपस्थित होते.