सांगली - संततधार पाऊस आणि कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. एका दिवसात 9 फुटांची वाढ झाल्याने आज दुपारी पाणी पातळी 26 फुटांवर पोहचली. त्यामुळे प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगली शहरातील नदी काठच्या व सखल भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने दिल्या आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णेची पाणी पातळी वाढली. शनिवारी दुपारी आयर्विन पुलाखाली नदीची पाणी पातळी 17 फूट होती त्यात वाढ होऊन आज दुपारी ती 26 फुटांवर पोहचली आहे. त्यामुळे कृष्णा नदीवर असणारा मौजे डिग्रज येथील बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तसेच औदुंबर येथील दत्त मंदीरातही नदीचे पाणी घुसले आहे.
कोयनाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने अगोदरच कृष्णा नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कृष्णा नदीच्या शेरी नाल्याच्या काठावर असणाऱ्या सखल भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.