सांगली - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरू आहे. सध्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी स्थिर झाली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला चांदोली धरणातून विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ सुरू होती. पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारपासून कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढत होती. सुरुवातीला 5 फुटांवर असणारी पाणी पातळी शुक्रवारी सकाळी 23 फुटांवर पोहोचली. मात्र, त्यानंतर पाणी पातळीतील वाढ कमी झाली आणि पातळी स्थिर झाली आहे.
दुसऱ्या बाजूला वारणा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली या ठिकाणी अतिवृष्टी सुरूच आहे. 24 तासांत या ठिकाणी 88 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. चांदोली धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. 34 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या धरणात पावसामुळे 29.5 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आणि धरण 81 टक्के भरले आहे. धरणातून 4,400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊन नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. सांगलीच्या हरिपूर येथील वारणा आणि कृष्णेच्या संगमावर पात्र विस्तीर्ण झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.