सांगली - कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि भाजपाचे पुणे पदवीधर मतदारसंघातले उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांची मतदानावेळी भेट झाली आणि मंत्री कदम यांनी देशमुख यांना यावेळी शुभेच्छा दिल्याची चर्चा होती. एकाच मतदार संघातील कट्टर विरोधक असणाऱ्या या नेत्यांच्या ऐन मतदानावेळी झालेली भेटी आणि मंत्री कदम यांनी दिलेल्या शुभेच्छामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
कट्टर विरोधकांच्या भेटीने उलट-सुलट चर्चा
पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडत आहे आणि आज मतदान सुरू असताना भाजपाचे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्रामसिंह देशमुख आणि काँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची कडेगावमध्ये भेट झाली. मतदान केंद्राच्या बाहेर एका कार्यकर्त्याच्या घरात हे दोन्ही नेते एकाच वेळी दाखल झाले. या भेटीवेळी मंत्री विश्वजित कदम यांनी संग्रामसिंह देशमुख यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्याची चर्चा होती. तर यावेळी काही जणांनी मंत्री कदम यांना हस्तांदोलन करून शुभेच्छा देण्याची विनंती केली. मात्र कदम यांनी नमस्कार केला. मंत्री कदम यांनी हातात हात दिल्यास ते पण अडचणीत येतील आणि मी पण अडचणीत येईन, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. केवळ सदिच्छा भेट असल्याचे यावेळी दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले.
पैरा फेडणार का?
वास्तविक कदम आणि देशमुख हे पारंपरिक कट्टर विरोधक मानले जातात. या मतदारसंघांमध्ये नेहमीच कदम विरुद्ध देशमुख असा संघर्ष राहिला आहे. मात्र गतवर्षीच्या निवडणुकीमध्ये संग्रामसिंह देशमुख यांनी माघार घेत, विश्वजीत कदम यांचा बिनविरोधाचा मार्ग सुकर केला होता. त्यामुळे पदवीधर निवडणुकीमध्ये मंत्री कदम हे पैरा फेडणार का? अशी जोरदार चर्चा असताना, अचानक मंत्री कदम आणि संग्रामसिह देशमुख यांची ऐन मतदानाच्या दिवशी झालेल्या भेटीमुळे, राजकिय वर्तुळात जोरदार उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.