सांगली - तुमच्या जंगला आम्ही घाबरत नाहीत, तासगावमध्ये येऊन दादागिरी मोडून काढू, असा खणखणीत इशारा, वसंतदादांचे नातू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना दिला आहे.
जिल्ह्यात फक्त वसंतदादा यांच्या प्रेमाची दादागिरी चालेल, असे स्पष्ट करत, माझ्या आडवे कोणी येऊ नका, असा गर्भित इशाराही विशाल पाटलांनी भाजपला दिला आहे. ते आपल्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी सांगली मध्ये आयोजित सभेत बोलत होते.
काही दिवसांपूर्वी संजय पाटील यांनी विशाल पाटलांच्या टीकेवर बोलताना आमचा संघ पाहिलाय आता जंग पहा अशी टीका केली होती. याचा समाचार घेत विशाल पाटलांनी ही टीका केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटलांनी आपल्या प्रचार शुभारंभाच्या सभेतून भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या ५ वर्षात जिल्ह्यातील ताकारी सिंचन योजनेसाठी केव्हा ७४ कोटी आले आहेत. टेंभूसाठी ० रुपयासुद्धा आला नाही. पण खासदार संजय काका पाटील मोठे बोलतात आणि थापा मारण्याचे काम करतात. केंद्राकडून जनतेसाठी निधी आणण्यात खासदार अपयशी ठरले आहेत. संसदेत अनेक खासदार आपल्या विकासासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रश्न विचारतात, या खासदारांनी किती प्रश्न विचारले हा प्रश्न आहे, असे मत व्यक्त करत, दिल्लीत तुम्हाला जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार म्हणून पाठवला आहे. जिल्ह्यात गुंडगिरी दादागिरीसाठी निवडून दिले नाही, असा टोला विशाल पाटलांनी लगावला.
काही दिवसांपूर्वी संजय पाटलांनी विशाल पाटलांच्या टीकेवर बोलताना, त्यांनी आमचा संग पाहिला आहे, पण जंग पाहिला नाही, असा इशारा विशाल पाटलांना दिला होता. या इशाऱ्याचा विशाल पाटलांनी भरसभेत समाचार घेतला आहे. जंग जरा धाडशी बोलणे झाले, तुमचा जंग म्हणजे काय? कमरेला बंदूक लावले म्हणजे जंग काय? असा सवाल करत, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांना कार्यालयात कोंडून, दगडे टाकणे हे तुमचे धाडस, मर्दानगी म्हणायची का? असा टोला लगावला. तुमच्या जंगला आम्ही घाबरत नाही, तासगावमध्ये येऊन तुमची दादागिरी मोडून काढू, असा दम विशाल पाटलांनी संजय पाटलांना दिला आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात फक्त वसंतदादांच्या प्रेमाची दादागिरी चालते हे तुम्हाला जनताच दाखवून देईल, असा इशाराही विशाल पाटलांनी संजय पाटील यांना दीला आहे.
आपल्याला खासदार संजय पाटील का घाबरतात हे समजले नाही. मला तिकीट मिळू नये यासाठी ते अनेक महाराजांच्याकडे गेले पण राजू शेट्टी महाराजाकडे जायचे राहिलेत असा टोला संजयकाका पाटलांना लगावला. माझ्या अंगात वसंतदादांचे रक्त आहे. मी साधा भोळा आहे, तेव्हा आडवे कोणी येऊ नका अशी भाजपच्या लोकाना माझी विनंती आहे. असा गर्भित इशाराही विशाल पाटलांनी यावेळी दिला आहे.