सांगली - मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवेदनशील होऊन निर्णय घेतले पाहिजे, अन्यथा पुढील पिढीवर विपरीत परिणाम होतील, असे मत भाजपचे नेते व माजी मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले आहे. तसेच सरकारने भावनेचा आदर करून शिवजयंती बाबत निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणीही तावडे यांनी केली आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.
सगळे चालू मग शिवजयंतीला परवानगी का नाही?
शिवजयंतीच्या परवानगीबाबत बोलताना तावडे म्हणाले की, शिवजयंती म्हणजे सामान्य माणसाचा भावनिक संबंध असणारा उत्सव आहे, कोरोनाबाबत सरकारला खबरदारी घ्यावी लागते, हे खर आहे. मात्र आता सगळे चालू झाले आहे, त्यामुळे आमचे दैवत शिवाजी महाराजांची जयंती साजरा करताना शिवजयंती मंडळे जर योग्य खबरदारी घेणार असतील, तर शासनाने परवानगी दिली पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी संवेदनशील होऊन निर्णय घ्यावा
संजय राठोड प्रकरण आणि राज्यातील मंत्र्यांवर होणारे आरोप याबाबत बोलताना तावडे म्हणाले की, राजकीय नेतृत्व हे समाजाला दिशा देणारे हवे, याचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवेदनशील होऊन निर्णय घेतले पाहिजे. तसे न झाल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो.
जयंत पाटलांनी पातळी सांभाळावी
महिला मतदार संघातून निवडणूक लढवणे हा कसला पुरुषार्थ अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर केली होती. याला देखील यावेळी विनोद तावडे यांनी प्रतित्युत्तर दिले आहे. राजकीय टीका एका विशेष पातळीवर झाली पाहिजे, मात्र मुद्दे नसले की, कुठल्याही थराला जाऊन टीका केली जाते. प्रदेशाध्यक्षपदाला हे शोभणारे नाही, त्यामुळे त्यांनी आपली पातळी सांभाळावी असे तावडे यांनी म्हटले आहे.