सांगली - राज्यातील मंत्र्यांनी दुष्काळ पाहणी दौऱ्याची सहल बंद करून चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर तातडीने सुरू करावेत. अन्यथा एकाही मंत्र्याला सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. तसेच दुष्काळी परिस्थिती बाबत जिल्हा प्रशासन सुस्तपणे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती वरून वंचित बहुजन आघाडीकडून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते व सांगली लोकसभेचे उमेदवारी गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनावर जोरदार टीका केली.
पडकर म्हणाले, आज जिल्ह्यातील तब्बल ४६७ गावांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, याठिकाणी योग्य नियोजन अद्याप प्रशासनाकडून करण्यात आले नसल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असताना केवळ जिल्ह्यात अवघ्या ५ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. तर शासनाच्या जाचक निकषांमुळे इतर ठिकाणी छावण्या सुरू करण्यास अडचणी येत असून ज्या छावण्या सुरू आहेत, त्याठिकाणी जनावरांना मुबलक चारा आणि खाद्यही मिळत नसल्याचा आरोप करत, छावणी संदर्भातील जाचक निकष बदलण्याची मागणी पडळकर यांनी यावेळी केली.
तसेच अनेक गावात पिण्याची पाण्याची भीषण स्थिती असून ४६८ दुष्काळी गावांसाठी केवळ ५०६ टॅंकर खेपा मंजूर आहेत. यामुळे या २० दिवसात एकदा पाणी मिळत आहे. त्यामुळे तातडीने पाण्याच्या खेपा वाढवण्याची गरज असून दुष्काळी जनतेला पाणी प्रशासनाकडून मिळाले पाहिजे,अशी मागणी यावेळी केली. तसेच सध्या सरकारच्या मंत्र्यांकडून केवळ जिल्ह्यात दुष्काळी पाहणी दौरे करून सहल साजरी करण्यात येत असल्याची टीका पडळकर यांनी सरकारवर केली. तसेच आधी दुष्काळाची पूर्तता करा अन्यथा एकही मंत्र्याला वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे.
तर गाई,बैल,म्हशी या जानवरांच्या व्यतिरिक्त इतर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असुन यामध्ये प्रामुख्याने गाढव,घोडे,शेळ्या-मेंढ्या यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.पण सरकारकडून या जनावरांच्या चारयाबाबत सरकारने कोणताही विचार केला नसल्याने , याकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या २१ मे रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात येणार असल्याचाही इशारा वंचितचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. त्याचा बरोबर दुष्काळा बाबतीतही प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढण्यात येणार असल्याचंही पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.