सांगली - कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमधील पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले आहे. तसेच, ज्या जिल्ह्यांमध्ये रूग्ण वाढ कमी होत नाही. त्या जिल्ह्यात मात्र हे निर्बंध असेच राहतील. त्यामुळे काही गोष्टींमध्ये शिथिलता जिथे करणे शक्य आहे, तिथे आम्ही करतो आहोत. जिथे करणे थोडसं अवघड आहे, तिथल्या नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मी धमक्यांना घाबरत नाही - मुख्यमंत्री
पुण्यातील व्यापार्यांनी वेळेच बंधन झुगारून दुकान उघडण्याच्या दिलेल्या इशाऱ्यावर बोलताना, मी असल्या धमक्यांना घाबरत नाही, असा प्रति इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच नागरिकांचे जीव वाचविणे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण वाढ कमी होत नाही, तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवतो आहोत,अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.