सांगली - पलूसमध्ये भरदिवसा एका उद्योजकावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. प्रदीप वेताळ असे या उद्योजकाचे नाव आहे. दोघा अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला आहे.
हेही वाचा - सांगली पालिका; सत्ताधारी भाजपचे आयुक्तांविरोधात धरणे आंदोलन
सांगली जिल्ह्यातील पलूस येथील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप आनंदराव वेताळ यांच्यावर गुरुवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गाडीवर गोळीबार केला. यामध्ये काच फुटून गोळी चालक बाजूच्या सीटमध्ये घुसली. त्यामुळे वेताळ हे थोडक्यात वाचले. भरदुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. उद्योजक वेताळ यांची पलूस एमआयडीसीमध्ये फौंड्री आहे. सकाळी ते फौंड्रीत गेले होते. यानंतर दुपारी काम आटपून ते जेवणासाठी गाडीतून घराकडे निघाले. वेताळ हे स्वत: गाडी चालवत होते. एमआयडीसीतून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळ असणाऱ्या घरासमोर आले असता अचानक डाव्या बाजूने दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी थेट वेताळ यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. मात्र, गोळी ही वेताळ बसलेल्या चालक सीटमध्ये घुसली, त्यामुळे ते थोडक्यात वाचले. यानंतर हल्लेखोर पसार झाले. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात नागरिकांनी वेताळ यांच्या गाडीजवळ धाव घेतली.
हेही वाचा - पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या कोल्ह्याच्या पिल्ल्याची सुखरूप सुटका
या घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी घटनास्थळी पोहोचत संपूर्ण घटनेची माहिती घेत तातडीने तपास सुरू केला आहे. हे हल्लेखोर कोण होते? कोणत्या कारणातून गोळीबार झाला, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. मात्र, या गोळीबाराच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.