सांगली - राज्यातील शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. लवकरच नुकसान भरपाई मिळेल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. सांगली जिल्ह्यातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणी दौऱ्यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत या दौऱ्यात काँग्रेसचे आमदार विश्वजित कदमही सहभागी झाले होते.
हेही वाचा... सरकार आम्हीच स्थापन करणार, अन्.. ५ वर्षे चालवण्यासाठी प्रयत्नही करणार - शरद पवार
दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टीमुळे यावर्षी सांगली जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने द्राक्षबागांना याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील आटपाडी आणि कडेगाव तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट बांधावर जात पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेत त्यांच्याशी संवाद साधला. विटा, नेवरी येथील टोमॅटो, द्राक्ष आणि डाळिंब बागांची ठाकरे यांनी यावेळी पाहणी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व कडेगावचे आमदार विश्वजित कदम हे सुद्धा होते.
हेही वाचा... राजस्थान : सांभर सरोवरात तब्बल २ हजार देशी-विदेशी पक्षांचा मृत्यू
उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनही नुकसानीचा आढावा घेतला. 'शिवसेना ही शेतकऱ्यांना पाठीशी असून लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल', असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीने विटा येथे उभारण्यात आलेल्या शेतकरी मदत केंद्राला भेट दिली. शेतकऱ्यांच्या अडचणी आपण जाणून घेतल्या पाहिजेत. माझ्याकडे त्या लेखी स्वरूपात पाठवा, अशा सूचना त्यांनी मदत केंद्र प्रमुखांना दिल्या.
हेही वाचा... सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: शशी थरुर यांना परदेशात जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी