सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुरळप गावात दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला, तर सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी कोरोनाचे प्रतिकृती रूप धारण करून विना मास्कचे फिरणाऱ्या नागरिकांच्या गळ्यात दोरीचा फास अडकवून कोरोनाविषयी प्रबोधन केले. सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतच असल्याने कुरळप ग्रामपंचायतीच्या कुरळप पोलीस स्टेशनच्या वतीने गुरुवार, शुक्रवार दोन दिवस कडकडीत बंद पाळल्याने अति आवश्यक मेडिकल व हॉस्पिटल वगळता सर्व व्यवहार बंद होते, तर गावात आतापर्यत निर्जंतुकीकरणाच्या सहा फवारण्या केल्या आहेत.
बाहेरून येणाऱ्या लोकांना गावात येऊ दिले जात नाही, जर कोणी आलेच तर त्यांना गावाबाहेरील प्राथमिक मराठी शाळेमध्ये संस्था विलगीकरण करण्यात येत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे 15 तारखेनंतर पुणे-मुंबईवरून येणाऱ्या तीन जणांना मराठी शाळेमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. आज साखराळे येथील प्राणी मित्र व सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी डोक्याला कोरोनाचा टोप व गळ्यात कवट्याची माळ, हातात दोरीचा फास यासारखा कोरोनाचा पेहराव करून विनाकारण रस्त्यावर फिरू नका, नाहीतर गळ्यात कोरोनाचा फास पडेल यासारखे नागरिकांना प्रबोधन करून लोकांना घरातच बसा सुरक्षित राहा, असा गावातून भर उन्हात अनवाणी फिरून सल्ला दिला आहे.