सांगली - जिल्ह्यातील आणखी दोघांना कोरोना लागण झाली आहे. मुंबई आणि गुजरातहून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये सांगली शहरातील एक आणि तासगावच्या गव्हाणमधील एकाचा समावेश आहे. या दोघांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असून सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता १३ वर पोहचला आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम असून कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू वाढू लागला आहे. बुधवारी सांगली जिल्ह्यातील आणखी दोघांना कोरोना लागण झाली आहे. मुंबई आणि गुजरातच्या अहमदाबादहून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील हे व्यक्ती आहेत. यामध्ये सांगली शहरातील एक आणि तासगावच्या गव्हाणमधील एकाचा समावेश आहे. सांगलीच्या चांदणी चौक नजीकच्या रेव्हेन्यू कॉलनी येथील एका मुंबईहुन आलेल्या व्यक्तीला ८ मे रोजी कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्रशासनाकडून त्याच्या संपर्कातील २१ जणांना ताब्यात घेत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. तर यामध्ये ३ पोलिसांचाही समावेश होता. यापैकी १७ जणांचे रिपोर्ट हे बुधवारी निगेटिव्ह आले होते. तर ४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत होते. यापैकी एका महिलेचा अहवाल हा बुधवारी रात्री उशीरा प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. तर, तासगाव तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला आहे.
तासगावच्या गव्हाणमधील एका व्यक्तीला कोरोना लागण झाली आहे. सदरचा व्यक्ती हा आटपाडीच्या साळशिंग येथे गुजरातच्या अहमदाबाद येथून आलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील आहे. १० मे रोजी सदर महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कोरोनाबाधित व्यक्तीबरोबर एकाच गाडीतून प्रवास केल्याने, त्या व्यक्तीला मिरजेच्या कोरोना रुग्णालयात दाखल केले होते. सदर व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता वाढत आहे.