सांगली - जत तालुक्यातील बेपत्ता झालेल्या २ लहान मुलांचे मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आले आहेत. एका ९ वर्षीय मुलीचे आणि अडीच वर्षाच्या मुलाचे गावात असणाऱ्या विहिरीत हे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी ही दोन्ही मुले अचानक बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल होते. तर एका पाठोपाठ हे दोन्ही मुलांचे मृतदेह सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.
जत तालुक्यातील वायफळ येथून ८ मार्च रोजी अडीच वर्षाचा मुलगा शिवराज दिगंबर यादव तसेच वज्रवाड येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी अक्षरा सिद्धय्या मठपती ही शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अचानक बेपत्ता झाली होती. मागील दोन दिवसात दोन लहान मुले एका पाठोपाठ अचानक बेपत्ता झाल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. तर या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरण झालेल्या अक्षरा मठपती या चिमुरडीचा शनिवारी सायंकाळच्या सुमारास तिच्या वज्रवाड गावात असणाऱ्या एका विहिरीत मृतदेह आढळून आला. संशयास्पद अवस्थेत हा मृतदेह सापडला असून मृत्यूचे कारण समजू शकले नाही. तर आज रविवारी सकाळी बेपत्ता झालेल्या अडीच वर्षीय शिवराज यादवचाही मृतदेह आढळून आला. वायफळ येथील गावातील विहिरीत शिवराजचा मृतदेह सापडला आहे. तर शिवराजच्याही मृत्यूचे कारण अस्पष्ट असून पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.
बेपत्ता आणि त्यानंतर सापडलेले या दोन्ही मुलांच्या संशयास्पदरित्या मृत्यूच्या घटनेमुळे पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. या प्रकरणी जत पोलीस अधिक तपास करत आहे. तर या घटनेमुळे जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.