सांगली - अक्षय तृतीयाचा मुहुर्तावर पार पडलेल्या सौद्यात हळदीला चांगले दर मिळाले आहेत. सांगलीच्या बाजार समितीमध्ये झालेल्या सौद्यात हळदीला १० हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय तृतीय निमित्ताने सांगलीच्या बाजार समितीमध्ये आज हळदीचे सौद्यांचा शुभारंभ झाला आहे. हळदीची जागतीक बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात हळद सांगलीच्या बाजारपेठेत दाखल होत असते. हळदीला याठिकाणी चांगला दर मिळतो. वर्षभर सांगलीच्या बाजार समिती आवारात हळदीचे सौदे पार पडतात. मात्र, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे काढण्याचीही सांगली बाजार पेठेची परंपरा आहे. त्यानिमित्ताने आज हळदीचे विशेष सौदे पार पडले आहेत.
प्रतिनिधीक ५ व्यापाऱ्यांच्या हळदीचे यावेळी जाहीर सौदे झाले. यामध्ये ६ हजारापासून तर १० हजारांपर्यंत हळदीला दर मिळाला आहे. कमीत कमी ६ हजार आणि जास्तीत जास्त १० हजार दर मिळाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.