सांगली - विधानसभा निवडणुकीत खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 344 मतदान केंद्रावर सोमवारी मतदान झाले. यात 1 लाख 96 हजार 213 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. झालेल्या मतदानाची अंदाजे टक्केवारी 67.25 टक्के इतकी आहे. सन 2014 च्या विधानसभा निवडणूकीवेळी 73 टक्के इतके मतदान झाले होते. यंदा मात्र ही टक्केवारी तब्बल 6 टक्क्यांनी घटली आहे.
तर, आटपाडी शहराचा भाग असलेल्या वॉर्ड क्र. 6 शेंडगेवाडी येथील ग्रामस्थांनी अनेक दिवसांची मागणी असणारा रस्ता होत नसल्याच्या कारणावरुन विधानसभा निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रशासनाला इशारा दिला होता. विधानसभा निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने सर्व तयारी केली होती. आमदार व प्रशासनाने ग्रामस्थांची भेट घेतली. परंतु ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नामुळे मतदान न करण्याचाच निर्णय घेतला. त्यामुळे या मतदारसंघाच्या इतिहासात विधानसभा निवडणूकीत एखाद्या गावाने मतदानावर पहिल्यांदाच बहिष्कार टाकल्याची घटना घडली.
खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3 लाख 22 हजार 343 मतदार आहेत. 344 मतदान केंद्रावर एकूण 2 हजार 107 कर्मचार्यांची नियुक्ती प्रशासनाकडून करण्यात आली होती. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी 7 ते 9 यावेळेत 13 हजार 652 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुसर्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 13 हजार 652 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तिसर्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.89 टक्के, चौथ्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 47.01 टक्के इतके मतदान झाले. तर पाचव्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत ६७.२५ टक्के मतदान झाले.