सांगली - पाण्याच्या शोधात कोरड्या विहिरीत पडलेल्या ३ सापांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सांगलीच्या बुधगावतल्या एका ६० फूट खोल विहिरीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करून सर्पमित्रांनी धामण जातीच्या सापांना विहिरीबाहेर काढले. त्यानंतर त्या सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले आहे.
उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात माणसांबरोबर जनावरांची भटकंती सुरू झाली आहे. पण ही भटकंती प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. सांगली नजीकच्या बुधगावमध्ये ३ सापांच्या बाबतीत असा प्रकार घडला. गावानजीकच्या कापसे प्लॉट येथील एका विहिरीत तीन साप पडले होते. काही शेतकऱयांच्या निदर्शनास ही बाब आली. यानंतर त्यांनी सांगलीतील सर्पमित्रांना याबाबतची कल्पना दिली. त्यानंतर तत्काळ सर्पमित्रांचे एक पथक विहिरीच्या ठिकाणी दाखल झाले.
रेस्क्यू ऑपरेशन करत ६० फूट खोल विहिरीत खाली उतरुन धामण जातीच्या असणाऱ्या या ३ सापांना पकडत, विहिरीतून सुखरूप बाहेर काढलण्यात आले. त्यांनतर या तिन्ही सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले. तब्बल १ तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.