सांगली - शिरढोण येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमवर दरोडा पडला आहे. हवेत गोळीबार करत दरोडेखोरांनी रोकड असलेली एटीएम मशीन पळवली आहे. या घटनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यात खळबळ माजली आहे.
हेही वाचा - समाजात दरी निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात वज्रमूठ आवळा - उपमुख्यमंत्री अजित पवार
हवेत गोळीबार करून एटीएम पळवले - कवठेमहांकाळ तालुक्यातल्या पंढरपूर महामार्गावरील शिरढोण येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर दरोडा पडला आहे. भर वस्तीमधील एटीएम सेंटरवर हा दरोडा टाकण्यात आला. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोर एटीएम सेंटरमध्ये घुसले.त्यानंतर सेंटरमध्ये असणाऱ्या चारही सीसीटीव्हीवर दरोडेखोरांनी स्प्रे मशीनद्वारे काळा कलर मारला. त्यानंतर या ठिकाणी असणारे दोन एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये एका एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दरोडेखोरांनी पैशांनी भरलेले एटीएम मशीन थेट दोरीच्या साहाय्याने गाडीला बांधून बाहेर काढले असता, आवाजाने आजूबाजूच्या नागरिकांना जाग आली.नागरिकांनी आरडाओरडा करत दरोडेखोरांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांकडून यावेळी हवेत गोळीबार करण्यात आला. त्यानंतर बाहेर काढण्यात आलेली एटीएम मशीन गाडीमध्ये घालून दरोडेखोरांनी पोबारा केला. चार ते पाच दरोडेखोरांकडून हा दरोडा टाकण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
शोधासाठी नाकेबंदी आणि पथके रवाना - या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस पथकासह पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने दरोड्याचा तपास सुरू केला. जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करत दरोडेखोरांच्या शोधासाठी विशेष पथकेही तैनात करून रवाना करण्यात आली आहेत. पण, या एटीएम मशीनमध्ये नेमकी किती रक्कम होती, हे समजू शकले नाही. शिरढोणमधून मळणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांना एटीएम मशीनचे काही अवशेष रस्त्यावर पडलेले आढळून आले आहेत. ते पोलिसांनी जप्त केले आहेत. याबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात चोरीची नोंद झाली आहे.
हेही वाचा - "मदर्स डे" निमित्ताने कवितेतून 'आई'बद्दल रामदास आठवलेंनी व्यक्त केली कृतज्ञता