सांगली - सांगली जिल्ह्यात आठ दिवसांसाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन संपुष्टात आणल्याचे सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी जाहीर केले आहे. मात्र, आधीच्या लॉकडाऊन प्रमाणे यापुढे जिल्ह्यात अंमलबजावणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 22 ते 30 जुलैपर्यंत ग्रामीण भाग वगळता महापालिका क्षेत्र, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर केला होता. गुरुवारी (30 जुलै) रात्री 10 वाजता लॉकडाऊनचा कालावधी संपणार असल्याने लॉकडाऊन वाढवला जाणार का ? याबाबत जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत 30 जुलैपर्यंतचा लॉकडाऊन हटवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. 22 ते 30 जुलैपर्यंत लावण्यात आलेला हा लॉकडाऊन संपुष्टात आणल्याचे जाहीर केले आहे.
मात्र, याआधीचा जो लॉकडाऊन होता. त्याप्रमाणे जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंदच, ई-पासद्वारे प्रवास बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. तसेच सकाळी 9 ते 7 व्यापार सुरु ठेवण्यास पूर्वी प्रमाणे परवानगी राहील. तसेच 5 ऑगस्टपासून मॉल्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आले असून, फूड रेस्टॉरंटना केवळ पार्सलची परवानगी असणार आहे, असे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य आणि केंद्र सरकारने यापूर्वी दिलेल्या नियमाप्रमाणे लॉकडाऊनची अंमलबजावणी राहणार असून नागरिकांनीही याचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले आहे. पुढील काळात जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन बाबतचा विचार करावा लागेल,असे जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.