सांगली - शासकीय रुग्णालयामध्ये अत्याधुनिक टेस्ट लॅब अखेर सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटक राज्याला याचा फायदा होणार आहे. पहिल्याच दिवशी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग येथील 22 स्वॅब तपासणीसाठी आल्याची माहिती, कोरोना रूग्णालय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिली आहे.
मिरज या ठिकाणी स्वॅब टेस्ट प्रयोगशाळा सुरू झाली आहे. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरामध्ये अत्याधुनिक स्वरूपाची ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील सुमारे 25 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली होती.
तर सांगली कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा ठिकाणच्या संशयित रुग्णांचे स्वॅब, पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते. मात्र, या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून नमूने तपासणीसाठी येत असल्याने रिपोर्ट प्राप्त होण्यास 1 ते 2 दिवसांचा कालावधी लागत होता. इस्लामपूरमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मिरजेचे शासकीय रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून जाहीर केल्यानंतर या ठिकाणी मंजूर झालेल्या लॅब उभारण्याच्या कामाला गती प्राप्त झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभी झाली आहे.
लॅब सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातून 21 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 1 असे २२ स्वॅब तपासणीसाठी मिरजेच्या लॅबमध्ये दाखल झाले आहेत. लवकरच याचे अहवाल संबंधित जिल्ह्यांना पाठवले जातील, अशी माहिती मिरज कोरोना रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे. तसेच मिरज येथे असणाऱ्या कोरोना रुग्णालयात कोरोना रुग्णांच्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. तर या सर्व सुविधा देणारे देशातील मिरजेतील हे एकमेव कोरोना रुग्णालय असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.