इस्लामपूर (सांगली) - लॉकडाऊनच्या काळात येथील शिक्षक दाम्पत्याने पक्षांसाठी घरटी बनवली आहेत. आष्पाक आत्तार व त्यांच्या पत्नी गुलजार आत्तार असे या दाम्पत्याचे नाव आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांना आपला वेळ कसा घालवायचा? असा प्रश्न पडला आहे. टाईमपास म्हणून कॅरम खेळणे, चित्र काढणे, टी. व्ही. पाहणे, शेतात काम करणे याकडे अनेकांचा कल वाढला आहे. अशातच काहींनी आपल्या उपजत कलागुणांना वाव देण्यास सुरुवात केली आहे. टाईमपास आणि इतरांच्या जगण्याची संधी असा दुहेरी उपक्रम शिक्षक आष्पाक आणि त्यांच्या पत्नी गुलजार आत्तार दाम्पत्यांनी साधला.
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मानवासह पशुपक्षांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. या कडक उन्हात पाण्यावाचून प्राणी पक्षांचा मृत्यूदरही वाढतच असतो. अशातच सतत होणारी अवैध वृक्षतोड वाढणारी सिमेंटची जंगले यामुळे पक्षी नामशेष होऊन त्यांचा किलबिलाट लुप्त होत असल्याचे चित्र आहे. एरव्ही सतत अंगणात येणारी, एवढ्याश्या पाण्यात स्नान करणारी आणि वेळप्रसंगी जेवणाच्या ताटा जवळ येऊन बसणारी चिमणी तर अलीकडे गायबच झाली आहे. निसर्ग साखळीत या प्राणी पक्षांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे या प्राण्या-पक्षांचे संगोपन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. याच उदात्त हेतूने शिक्षक आष्पाक आणि त्यांच्या पत्नी शिक्षिका गुलजार आत्तार यांनी आपल्या इस्लामपूर येथील घराजवळ पक्षांसाठी स्वतः घरटी तयार केली.
हेही वाचा - गूड न्यूज: मागील 14 दिवसांत 78 जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही
या घरट्यांवर 'पक्षी वाचवा निसर्ग वाचवा', 'पक्ष्यांचे रक्षण, सुख समृद्धीचे लक्षण', 'चलो आज आदमी से फरिश्ते बन जाये, एक पक्षी की जान बचाएं', 'पक्षी है खेतों की शान', 'जीवन में एक नियम बनाओ, पक्षीयों को घर का सदस्य बनाओ', 'पक्षी बचाव, जीवन बचाव', असे एक ना अनेक संदेश लिहून पक्ष्यांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. सुंदर हस्ताक्षरात लिहिलेल्या या शुभ संदेशामुळे घरटेही आकर्षक दिसत आहेत. शिवाय या रंगीबिरंगी घरटयांमुळे त्यांच्या अंगणामध्ये पक्ष्यांचा राबता वाढला असून किलबिलाट सुरू झाला आहे. वेगवेगळ्या फळांसह फुलझाडांचाही त्यांच्या अंगणामध्ये समावेश आहे. यामुळे दिवसभर हे पक्षी या फळ आणि फुलझाडांवर विसावलेले असतात. गुलजार आत्तार या अंगणामध्ये दररोज सकाळी धान्याची रांगोळी काढून पक्षांच्या घासाची तजवीज करत आहेत. मातीच्या भांड्यात पाणीही ठेवले जात असल्यामुळे चिमणी, लाल बुडाचा पक्षी, कबूतर, कोकीळ या पक्ष्यांचा सध्या येथे राबता आहे. आष्पाक आत्तार यांनी यापूर्वी निसर्ग आणि पर्यावरण जनजागृतीसाठी झाडांवर सुंदर हस्ताक्षरात बोधवाक्य लिहून झाडांनाच बोलके केले होते. त्यांच्या या आदर्श उपक्रमाचे अनेकांनी कौतुक करुन अनुकरणही केले. आत्तार दाम्पत्याने आपल्या उपक्रमातून लॉकडाऊनचा केलेला हा सदुपयोग समाजासमोर एक आदर्श आहे.
या उपक्रमाबद्दल काय म्हणाले आष्पाक आत्तार?
समाजातील प्रत्येकाने असा प्रयत्न केल्यास कदाचित लुप्त झालेल्या पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा सर्वांना ऐकायला मिळेल. पर्यायाने निसर्ग आणि पर्यावरणाचेही रक्षण होण्यास मदत होईल. बदलती जीवन शैली, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, मोबाईलचे टॉवर, रेंज यामुळे चिमण्यांसह अनेक पक्षांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांना घरटी करण्यास जागा उपलब्ध होत नाही. परिणामी ते मानवापासून दूर जाऊ लागले आहेत. निसर्गाशिवाय वृक्षारोपणात या पक्षांचे महत्त्व आहे. त्यामुळे या पक्षांसाठी अंगणात गच्चीवर घरटे बांधून शिवाय थोडे अन्न, पाणी ठेवून या चिमण्यांसह पक्षांची संख्या वाढवता येईल. शिवाय मुलांमध्येही आवड निर्माण होऊन त्यांच्याकडून निसर्ग संवर्धनाचा प्रयत्न होईल.