सांगली : कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढत असताना कृष्णा नदी पात्रामध्ये पोहणाऱ्यांच्या उड्या पडत आहेत. 20 फुटांवरून कृष्णेच्या विस्तीर्ण पात्रामध्ये या थराराक उड्या पाहण्यासाठी आयर्विन पुलावर नागरिकांची झुंबड उडाली आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी जवळपास 35 फूट झाली आहे. पाण्याच्या वाढत्या पातळीमध्ये आता सांगलीतल्या जलतरणपटू आणि पोहणाऱ्यांच्या उड्या पडत आहेत. सांगलीच्या आयर्विन पुलावरून अनेक होणारे हौशी जलतरणपटू थरारक अशा उड्या टाकत आहेत. विस्तीर्ण असलेल्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पुराच्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी हौशींनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. तर, 20 फूट उंचीवरून कृष्णेच्या पात्रात टाकण्यात येणाऱ्या थरारक उडया पाहण्यासाठी नागरिकांची आयर्विन पुलावर आणि नदीकाठी मोठी गर्दी होत आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून कृष्णा पाणलोट क्षेत्रात पडणारा संततधार पाऊस आणि कोयना धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्ग त्यामुळे सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. चार दिवसात सांगलीच्या आयर्विन पूलाखाली पाणीपातळी 25 फुटांनी वाढली होती. त्यामुळे मंगळवारी कृष्णेची पातळी 39.1 फुटांवर पोहोचली होती. सांगलीमध्ये कृष्णेची इशारा पातळी 40 फूट तर धोका पातळी 45 फूट आहे. कृष्णेचे पाणी आता काही प्रमाणात ओसरू लागले आहे. सांगली शहरात अर्ध्या फूटापेक्षा जास्त पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांना आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.