सांगली - शेतीला दिवसा वीज देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरु असलेल्या आंदोलनाला सांगलीत हिंसक वळण लागले ( Swabhimani Shetkari Sanghatana Agitation ) आहे. कसबे डिग्रज येथील वीज वितरण कार्यालय पेटवून देण्यात आले आहे. तर, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडण्यात आला आहे.
शेतात रात्रीच्या वेळेस पाणी देताना एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजु शेट्टी सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्याची दखल राज्य सरकारने आणि वीज वितरण विभागाने न घेतल्याने शेतकरी संघटनेने उग्र रुप धारण केले आहे.
मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज याठिकाणी वीज वितरण कार्यालयाला आग लावण्यात आली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालय पेटवले आहे. या घटनेनंतर अग्निशमन विभागाकडून कार्यालयाला लागलेली आग विझवण्यात आली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात कार्यालयाचे नुकसाने झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोडला साप...
तर राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयात साप सोडण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळच्या सुमारास जिवंत साप सोडला आहे. राज्य सरकारने व ऊर्जा विभागाने तातडीने शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची भूमिका घ्यावी. अन्यथा पुढील काळात आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.