सांगली - जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना शासनाने तातडीने सुविधा द्याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विशाल पाटील यांनी केली आहे. या बाबतच्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सांगली जिल्ह्यात सध्या दुष्काळीची दाहकता वाढत आहे. मे महिना सुरू झाला असून या महिन्यात दुष्काळी भागात नागरिकांना पाणी टंचाईसह अनेक समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागणार आहे. शासनाने दुष्काळी सवलत जाहीर केली आहे. मात्र ती दुष्काळग्रस्त जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे नेते आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विशाल पाटील यांनी केला. तसेच दुष्काळी तालुक्याना शासनाने जाहीर केलेल्या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेऊन केली. यावेळी विशाल पाटील यांनी दुष्काळी भागातील जनतेच्या समस्यांवर जिल्हाधिकाऱ्याशी तासभर चर्चा केली.
दुष्काळी भागाला शासनाच्या जाहीर निकषाप्रमाणे सवलती मिळाव्यात, आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा, त्याच बरोबर टेम्भू, म्हैसाळ, ताकारी आणि आरफळ योजनांचे पाणी कॅनॉलद्वारे सोडून बंधारे, पाझर तलाव भरण्यात यावेत, तर ओढा नाल्यातही पाणी सोडावे, त्याच बरोबर आचारसंहितेमुळे दुष्काळी जनतेची सुरू असणारी होरपळ आणि जनावरांचा टाहो याकडे आपण लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
प्रशासनाने आचारसंहितेची तमा न बाळगता तातडीने जत, आटपाडी, तासगाव, कवठे महांकाळ या दुष्काळी परिसरात शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दुष्काळी सुविधा देण्याची आग्रही मागणीही विशाल पाटील यांनी केली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,अमित पाटील यांच्यासह दुष्काळी भागाचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.