सांगली - पगारवाढ व सातवा वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील साखर कामगार हे येत्या 30 नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. दीड लाख साखर कामगार या आंदोलनात उतरणार असल्याची माहिती साखर कामगार युनियनकडून देण्यात आली आहे. गेल्या चौदा महिन्यांपासून राज्यातल्या साखर कामगारांचे करार प्रलंबित आहेत.
- सरकारकडून कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष
राज्य सरकार आणि साखर संघाकडे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, याकडे केवळ दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्यात साखर कारखानदारांची सत्ता आल्यावर किमान कामगारांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकारने कामगारांच्या मागण्यांबाबत दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली, असा आरोप कामगार युनियनकडून करण्यात आला आहे.
- 30 नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर
मागण्या पूर्ण होत नसल्याने आता कामगारांसमोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याने येत्या 30 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजल्यापासून राज्यातल्या सर्व साखर कारखान्याचे कामगार बेमुदत संपावर जातील आणि कारखाने बंद पडतील, असे महाराष्ट्र राज्य साखर कामगार युनियनकडून जाहीर करण्यात आले आहे..
- कारखानदारांवर दुहेरी संकट
सांगलीमध्ये राज्याच्या कामगार युनियनच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे साखर हंगाम सुरू होताना शेतकरी संघटनेच्या आंदोलनाबरोबर साखर कारखानदारांना कामगारांच्या आंदोलनालाही सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कारखानदारांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. राज्य सरकारने कामगारांच्या मागण्याच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर बेमुदत आंदोलन चालूच राहील, असा इशारा राज्य साखर कामगार युनियनचे सचिव प्रदीप शिंदे यांनी दिला आहे.
हेही वाचा - 'राज्यात कृषी कायद्यात लवकरच दुरुस्ती, पाकिस्तानपेक्षा भाजपाचा मोठा शत्रू शेतकरी'
हेही वाचा - कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी रस्त्यावर, सांगली-कोल्हापूर महामार्गावर चक्काजाम