सांगली - कृष्णा नदीची पाणी पातळी आता हळूहळू घटू लागली आहे. मात्र, आता कृष्णा नदीवरील स्टंटबाजीचा प्रकार समोर येऊ लागला आहे. शहरातील आयर्विन पुलावरून जीवघेण्या उड्या काही हौशी जलतरणपटू मारत आहेत. एका तरुणाचा नदीवरील उंच पुलावरून पाण्यात उडी टाकण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुलावरून नदी जीवघेणी उडी
सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली. त्यामुळे नदीची पाणी पातळी 23 फुटांवर पोहोचली. आता त्याच्यामध्ये घट होऊन पाण्याची पातळी 20 फुटांवर आली आहे. एका बाजूला ही परिस्थिती असताना आता या नदीच्या पात्रामध्ये स्टंटबाजीचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. शहरातल्या आयर्विन पुलावरून नदीच्या पात्रामध्ये थेट उड्या मारल्या जात आहेत. पुलाच्या संरक्षक लोखंडी ग्रीलवरून नदीच्या पात्रात उंच उडी मारल्याचा एका तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गेल्यावर्षीही असाच प्रकार घडला
जीवघेणी आणि काळजात धडकी भरवणारी, अशी ही उडी आहे. गेल्यावर्षी आयर्विन पुलावर अशाच पद्धतीने उड्या मारण्याचे प्रकार सुरू होते. यानंतर पोलिसांनी पुलावरून उडी मारण्यास बंदी घालत कारवाई केली होती. मात्र आता नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर पुन्हा तोच प्रकार घडत आहे. त्यामुळे भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांकडून कारवाईची मागणी होत आहे.
हेही वाचा - अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरण : प्रदीप शर्मा व सचिन वाझे यांनीच रचला कट; 'एनआयए'चा दावा