सांगली - महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक सरकारकडून कोरोना चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्याच्या कर्नाटक सीमेवरील कागवाड या ठिकाणी तपासणी करून कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोरोना चेक पोस्ट -
कर्नाटक सरकारकडून गेल्या 4 दिवसांपासून महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्याच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कर्नाटक हद्दीतील कागवड याठिकाणी कर्नाटक सरकारकडून कोरोना चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. दोन दिवसांपासून या ठिकाणी थोडी ढिलाई होती. मात्र, आता या ठिकाणी प्रवेशाबाबत कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. सरसकट प्रवाशांची आता थर्मल स्कॅनिंग मशीनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतरच कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश देण्यात येत आहे. कर्नाटक पोलीस आणि आरोग्य प्रशासनाकडून याठिकाणी कसून तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक प्रवाशाला मास्क वापरणे बंधनकारक असण्याबरोबर कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच कोरोना संशयास्पद व्यक्ती असल्यास त्याच्याकडून कोरोना टेस्ट प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे, अन्यथा त्या प्रवाशाला कर्नाटकमध्ये प्रवेश देण्यात येत नाही.