सांगली - ऊसदर आणि शेतीमालासंबधित विविध मागण्यांसाठी सांगलीत शेतकरी संघटनेचा 'राज्यस्तरीय शेतकरी मेळावा' पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सांगली शहरातून बैलगाडी रॅली काढण्यात आली.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये बैलगाड्या घेऊन शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 12 डिसेंबर हा शहीद बाबू गेनू आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. त्यानिमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आणि बैलगाडी रॅलीचे सांगलीत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रघुनाथ पाटील यांनी दिली.
हेही वाचा - मुंबई : दहिसर येथे वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा
देशाबाहेरून शेतमाल आयात केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला. या मेळाव्याच्या माध्यमातून ऊसदर आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व्यापक आंदोलन छेडण्यात येणार आहे, असेही पाटील म्हणाले.