भोकरदन (जालना) - भोकरदन ते जाफराबाद रस्त्यावरील विरेगाव येथील पुलाजवळ औरंगाबादहून मलकापूरकडे भरधाव जाणाऱ्या एसटीने दुचाकीस जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील पती पत्नी जखमी गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले परंतु त्यांचा मृत्यू झाला. हे पती पत्नी भोकरदन येथे लग्नाच्या कार्यक्रमास वालसावंगी येथून येत होते. विष्णू त्रंबक गारुडी (वय 55) व पत्नी मंगलाबाई विष्णू गारुडी (वय 50), असे अपघातात मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नावे आहेत.
एसटीने दुचाकीला दिली जोराची धडक-
वालसावंगी ता. भोकरदन येथील विष्णू त्रंबक गारुडी व त्यांच्या पत्नी मंगलाबाई विष्णू गारुडी हे आपल्या दुचाकीवर भोकरदन येथे आज (गुरवार) एका लग्नासाठी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान येत होते. विरेगाव जवळील पुलाजवळ आल्यानंतर औरंगाबाद-मलकापूर या एसटीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दोघेही गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्यांना तात्काळ जालना येथे हलविण्यात आले. परंतु जालना येथे नेत असताना पती विष्णू गारुडी यांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली तर जालना येथे उपचारा दरम्यान मंगलाबाई ही मरण पावल्या. या घटनेमुळे वालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, अपघातानंतर सदरील एसटी भोकरदन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून चालक ही पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
मदत न करता घटनास्थळी नागरिक फोटो, व्हिडिओ काढण्यात मग्न-
दरम्यान, या अपघातमध्ये गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नी कित्येक वेळ घटनास्थळावर तसेच पडलेले होते. नागरिक फक्त आपल्या मोबाईलमध्ये फोटो व व्हिडिओ काढण्यात मग्न होते. पण कोणीही मदत करण्यास पुढे आले नव्हते. त्याच रस्त्याने जाणारे सामाजिक कार्यकर्ते विष्णु गाढे, नामदे यांनी आपल्या गाडीमध्ये त्या पती-पत्नीला टाकून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
हेही वाचा- कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे राज्यात आणखी तीन रुग्ण; दोघांना डिस्चार्ज