सांगली - एक महिन्यांपासून बंद असलेली एसटी आता धावू लागली आहे. जिल्ह्यासह कोल्हापूर अशा फेऱ्या सांगली आगाराकडून आता सुरू झाल्या आहेत. मात्र, गेल्या महिन्यापासून एसटीची चाक थांबल्याने सांगली आगाराचे जवळपास पंचवीस एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता हे नुकसान भरुन काढण्याबरोबर प्रवाशांच्या अखंड सेवेसाठी "लालपरी" धावू लागली आहे.
लॉकडाऊनचा "लाल परी"ला बसतोय जबर फटका
"बहुजन हिताय, बहुजन सुखाय" एसटीचा हे ब्रीदवाक्य. सर्वसामान्य आणि गोरगरीब माणसासाठी प्रवासाचा सुरक्षित आणि हक्काचे साधन म्हणजे एसटी महामंडळ बस.अशा या एसटी महामंडळा 1 जून रोजी 73 वर्षे पूर्ण झाली आहेत. अखंडपणे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एसटीची "लाल परी" मोठ्या दिमाखात धावत असते. अशा या लाल परीचा आजपर्यंतचा प्रवास खडतरच राहिला आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे 'लाल परी" प्रवास बिकट बनला आहे.
22 ते 25 कोटींचा फटका
कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होत आहेत. त्यामुळे एसटीचा चाक थांबत आहेत. सांगली जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून असणाऱ्या कडक निर्बंधामुळे एसटी सेवा ठप्प झाली होती. जिल्ह्यात जवळपास दहा आगार आहेत. जिल्ह्याअतंर्गत, त्याच बरोबर इतर जिल्ह्यात आणि लांबच्या पल्ल्याचे एसटी सेवाही बंद झाली. सांगली एसटी आगारात सुमारे 750 एसटीच्या फेऱ्या होत असतात. त्यातून दिवसाकाठी सुमारे 75 लाखांचा व्यवसाय सांगली आगाराचा आहे. मात्र, गेल्या एक महिन्यापासून एसटीची सेवा बंद होती. त्यामुळे जवळपास एक महिन्यात 23-25 कोटी रुपयांचा फटका सांगली एसटी आगाराला बसला आहे.
एसटी सेवा पुन्हा सुरू
अडचणीत असणाऱ्या एसटी आगाराला एसटी मालवाहतूक सेवेमुळे थोडाफार फायदा मिळाला आहे. मात्र तुलनेने तो कमीच राहिला आहे. आता मात्र एसटीची चाके पुन्हा धावत आहेत. राज्य शासनाच्या आणि जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील एसटी सेवा सुरू झालेली आहे. प्राथमिक स्तरावर सांगली एसटी आगाराकडून जिल्हा अंतर्गत सेवेसह कोल्हापूर, अशी एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. 50 टक्के प्रवासी क्षमतेनुसार व कोरोना नियमांचे पालन करून 66 फेऱ्या सध्या प्राथमिक पातळीवर सुरू करण्यात आल्या असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून, यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे सांगली आगाराचे व्यवस्थापक अरुण वाघाटे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - परदेशी कंपनीकडून द्राक्ष निर्यातदार कंपनीला गंडा, संचालकाकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल